मुल : गावठी डुकरे पालन करणाऱ्यांकडून शहरात मोठ्या प्रमाणात डुकरे सोडण्यात आली आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन डुकरांना शहराबाहेर घालवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगर परिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मुल शहराचा विकास मागील दहा ते पंधरा वर्षांत झपाट्याने झाला. त्यामुळे नव्याने अनेक वस्त्या निर्माण झाल्या. शहरात मोठ्या प्रमाणात तलाव व बोडी आहेत, तसेच जुन्या वस्त्यांच्या आजूबाजूला शेतजमीन आहे. या भागात सहजपणे डुकरे राहू शकतात. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून डुकरे पालन करणाऱ्यांनी शहरात मोकाट डुकरे सोडली. वर्षागणिक डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी अनेक भागात अस्वच्छता दिसून येते. डुकरांच्या विष्ठेतून स्पेक्ट्रम नावाचा जंतू निर्माण होतो. तो मानवासाठी अत्यंत घातक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे डुकरांना शहराबाहेर घालवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




