मूल नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेल्या या पदासाठी अनेक जण आपले नाव पुढे करत आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविण्यास इच्छुक असलेल्या शिवानी संदीप आगडे यांचे नाव समोर आले आहे.
शिवानी आगडे ह्या मूल शहरातील प्रतिष्ठित बांधकाम साहित्य पुरवठादार संदीप आगडे यांच्या पत्नी असून त्या भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. त्यांनी निवडणुकीच्या संदर्भात पक्षाशी संपर्क साधला असून आपली उमेदवारी अधिकृत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले आहेत. काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनीही उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. तथापि, भाजपकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची सर्वाधिक गर्दी आहे. पक्षातील उमेदवारांची निवड लवकरच केली जाईल, असे सांगितले जात आहे.
या निवडणुकीला पुन्हा एकदा मूल शहरातील राजकीय वातावरण चांगलेच रंगणार असून, प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांसाठी चांगली निवडणूक होईल, अशी चर्चा आहे.




