‘गडचिरोली : नद्यांचा जिल्हा – समृद्धीचा कणा’
गडचिरोली, घनदाट जंगलं आणि नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी ओळखला जाणारा जिल्हा, ‘नद्यांचा प्रदेश’ म्हणूनही ओळखला जातो. या जिल्ह्याच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक जीवनात नद्यांना विशेष महत्त्व आहे. नद्यांनी गडचिरोलीची जमीन सुपीक केली आहे, जैवविविधता जपली आहे, आणि इथल्या जनजीवनाला एक वेगळी ओळख दिली आहे.

गडचिरोलीतील नद्यांचे जाळे
गडचिरोली जिल्ह्यात अनेक लहान-मोठ्या नद्या आहेत. काही नद्यांचा उगम इथेच होतो, तर काही शेजारच्या राज्यांतून जिल्ह्यात येतात.
- जिल्ह्यात उगम पावणाऱ्या नद्या: सती नदी (७१ किमी), खोब्रागडी नदी (८१ किमी), कठाणी नदी (५८ किमी), पोहार नदी (४९ किमी), दिना नदी (४५ किमी), आणि सर्वात मोठी प्राणहिता नदी (११५ किमी) या नद्या गडचिरोलीतच उगम पावतात.
- बाहेरून येणाऱ्या नद्या: वैनगंगा (जिल्ह्यात १६९ किमी), गाढवी (४५ किमी), पर्लकोटा (४३ किमी), पामुलगौतम (४० किमी), इंद्रावती (१३१ किमी), आणि गोदावरी (४६ किमी) या नद्या इतर जिल्ह्यांतून आणि राज्यांतून गडचिरोलीत प्रवेश करतात.
गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व सीमेवरून वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती या पाच प्रमुख नद्या वाहतात. वैनगंगा नदी जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून वाहत जाते आणि चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे वर्धा नदीला मिळते. या दोन्ही नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला ‘प्राणहिता’ असे म्हणतात. पुढे, ही नदी जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून वाहत जाऊन सिरोंचा येथे गोदावरीला मिळते. इंद्रावती नदी जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व सीमेवरून वाहते आणि सिरोंचा तालुक्यातील सोमनूरजवळ गोदावरीला मिळते. बांडिया, पर्लकोटा आणि पामलगौतम या नद्या इंद्रावतीला मिळतात. तर, गाढवी, खोब्रागडी, कठाणी, वैलोचना आणि दिना या नद्या जिल्ह्याच्या उत्तर भागात वाहतात. यापैकी पहिल्या चार नद्या वैनगंगेला, तर दिना नदी प्राणहिता नदीला मिळते.
गडचिरोलीतील महत्त्वाचे नदी संगम
नद्यांच्या संगमामुळे गडचिरोलीत काही विशेष स्थळे तयार झाली आहेत, ज्यांना धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्व आहे.
- त्रिवेणी संगम (भामरागड): भामरागडमध्ये पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती या नद्या एकत्र येतात. पावसाळ्यात येथील दृश्य खूप आकर्षक असते. या संगमावर नयनरम्य सूर्योदय व सूर्यास्त पाहता येतो.
- सोमनूर त्रिवेणी संगम (सिरोंचा): सिरोंचा तालुक्यातील सोमनूर येथे इंद्रावती, गोदावरी आणि अदृश्य असलेली अंतरवाहिनी या नद्यांचा संगम होतो. हे स्थळ धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी नदीचे पात्र मोठे असून, वाळू व खडकांवरून वाहणाऱ्या प्रवाहाचा नादमधुर आवाज पर्यटकांना आकर्षित करतो.
- वैनगंगा-वर्धा संगम (चपराळा): गडचिरोलीच्या चपराळा येथे वैनगंगा आणि वर्धा या दोन मोठ्या नद्या एकत्र येतात आणि त्यांना ‘प्राणहिता’ असे नाव मिळते. ही नदी पुढे तेलंगणात गोदावरीला मिळते.
नद्या आणि स्थानिक जीवन
गडचिरोलीतील नद्या केवळ पाण्याचे स्रोत नाहीत, तर त्या इथल्या लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. नद्यांच्या काठावर शेतकरी भात आणि भाजीपाला पिकवतात. ‘मरियाण’ शेती पद्धतीमुळे स्थानिक समाजाला मोठा आधार मिळाला आहे. ढिमर समाजासाठी नद्या मासेमारीचे प्रमुख साधन आहेत. नद्यांच्या काठावर अनेक प्राचीन मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत. तसेच, नद्यांचे संगम पर्यटन वाढवण्यातही मदत करतात.
गडचिरोली जिल्ह्यातील नद्या या फक्त जलस्रोत नाहीत तर त्या जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनाचा कणा आहेत. या नद्यांनी गडचिरोलीला एक अनोखी ओळख दिली आहे. औद्योगिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यासाठी, येथील नद्यांचे विस्तीर्ण जाळे भविष्यात मालवाहतुकीसाठी उपयुक्त ठरू शकते. शेतीला पोषण, मासेमारीला आधार, जैवविविधतेला आश्रय आणि संस्कृतीला आधार देणाऱ्या या नद्यांचे जतन करणे ही काळाची गरज आहे.
- गजानन जाधव, जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली.




