spot_img
Saturday, December 13, 2025
HomeMaharashtraगडचिरोलीउपचारात हलगर्जीपणा भोवला ! बालकाच्या मृत्यू प्रकरणी कंत्राटी डॉक्टर बडतर्फ;

उपचारात हलगर्जीपणा भोवला ! बालकाच्या मृत्यू प्रकरणी कंत्राटी डॉक्टर बडतर्फ;

उपचारात हलगर्जीपणा केल्याने आणि वेळेत रुग्णवाहीका उपलब्ध न झाल्याने चार वर्षीय आर्यन तलांडी या चिमुकल्याचा २४ जून रोजी मृत्यू झाला होता.

गडचिरोली : उपचारात हलगर्जीपणा केल्याने आणि वेळेत रुग्णवाहीका उपलब्ध न झाल्याने चार वर्षीय आर्यन तलांडी या चिमुकल्याचा २४ जून रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी वृत्त प्रकाशित करताच खळबळून जागे झालेल्या प्रशासनाने पेरमिली आरोग्य केंद्रातील कंत्राटी डॉक्टरला तडकाफडकी बडतर्फ केले आहे. सोबतच वैद्यकीय अधिकारी व वाहनचालक यांना नोटीस बजावली असून चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे.

आर्यन अंकित तलांडी (४, रा. कोरेली ता. अहेरी) यास २३ जूनच्या रात्री पोटदुखीचा त्रास सुरु झाला. कुटुंबाने पेरमिली आरोग्य केंद्रात त्याला उपचारासाठी नेले. उपचारानंतर आर्यनला पालकांनी घरी कोरेलीला परत नेले. २४ जूनला पहाटे अधिक त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा पेरमिली आरोग्य केंद्रात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यास अहेरी येथे नेण्यास सांगितले. परंतु, वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पालक आर्यनला घेऊन बसने अहेरीसाठी निघाले.

चालक गौरव आमले यांना लक्षात येताच त्यांनी बस थेट आलापल्ली येथील आरोग्य केंद्रात नेली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान, तीन दिवसांनी ही बाब समोर आली. ‘लोकसत्ता’ने या प्रकरणास वाचा फोडल्यानंतर यंत्रणा हलली. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी पेरमिली आरोग्य केंद्रातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल मेश्राम यांना बडतर्फ केले असून वैद्यकीय अधिकारी व वाहनचालक या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हा महिला व बालरोग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली त्रिस्तरीय समिती नेमली आहे. यात तालुका वैद्यकीय अधिकारी व वाहन विभागातील अधिकाऱ्याचा समावेश आहे. २८ जूनला या समितीने पेरमिली आरोग्य केंद्रास भेट देऊन माहिती घेतली. समितीच्या अहवालानंतर कारवाईची पुढील दिशा ठरवली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले.

रुग्णवाहिका उपलब्ध, चालक गैरहजर

या आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध होती, पण आर्यन तलांडी यास रेफर करताना चालक गैरहजर होता, अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. हा चालक सुटीवर होता की त्याने अधिकाऱ्यांना न विचारता दांडी मारली होती, हे चौकशीतच स्पष्ट होणार आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे