spot_img
Saturday, July 19, 2025
HomeMaharashtraगडचिरोलीजेवणात टाकले विष, पाच चिमुकल्यांसह २८ जणांना बाधा; तीन अत्यवस्थ

जेवणात टाकले विष, पाच चिमुकल्यांसह २८ जणांना बाधा; तीन अत्यवस्थ

बारशाच्या कार्यक्रमात बनविलेल्या मांसाहरी जेवणात विष टाकल्याने २८ जणांना बाधा झाल्याची धक्कादायक घटना ४ जुलैला सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली.

गडचिरोली : बारशाच्या कार्यक्रमात बनविलेल्या मांसाहरी जेवणात विष टाकल्याने २८ जणांना बाधा झाल्याची धक्कादायक घटना ४ जुलैला सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली. यात पाच चिमुकल्यांचा समावेश असून सर्वांवर उपचार सुरु आहेत. ही घटना धानोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील छत्तीसगड सीमेवरच्या झाडापापडा ग्रामपंचायत अंतर्गत रोपीनगट्टा येथील आहे.राेपीनगट्टा येथील सुरगू मुरा टेकाम यांच्या नातनीच्या नामकरण विधीचा कार्यक्रम ४ जुलैला आयोजित केला हाेता.

यानिमित्ताने टेकाम परिवाराने खास सामीश जेवणाचा बेत आखला होता. मात्र, पहिल्या पंगतीत जेवण केलेल्यांना १५ मिनिटांतच उलट्या, मळमळ, डोकेदुखी असा त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. दुसरी पंगत थांबविण्यात आली. प्रकृती अत्यवस्थ झालेल्या सर्व १८ जणांना पेंढरी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर २२ जणांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून सहा जणांना छत्तीसगड राज्यातील पाखांजूर येथे हलविण्यात आले आहे. यातील तिघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

घटनास्थळ नक्षलग्रस्त भागात असल्याने सुरक्षा यंत्रणा दक्ष झाली आहे. पेंढरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अन्न व औषध प्रशासन विभागाला पाचारण करुन अन्न नमुने घेण्याचे काम सुरु आहे. पक्ष्यांना मारण्यासाठीचे विषारी द्रव मांसाहरी जेवणात टाकल्याचा प्राथमिक अंदाज असून ते कोणी टाकले, कशासाठी टाकले हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. यासंदर्भात पेंढरी पोलिसांशी संपर्क होऊ शकला नाही.

यांचा आहे समावेश

टिब्बू वड्डे, गांगो वड्डे, कालिराम उसेंडी, रमू टेकाम, कंद्राम उसेंडी, सन्नू पदा, अमित उसेंडी, सुकराम उसेंडी, साहिल पदा, चमरसिंग उसेंडी, रमेश हिडको, नेहरु उसेंडी, समलाल हिडको, बाजीराव दुग्गा, कातुराम तोफा, सुरगु टेकाम,मंकू उसेंडी, सरडू पदा, परडू पदा, लखन हिडको, अकबर लकडू, झगडू नरोटे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून सुखदेव पडा, दिव्या दुग्गा, विनोद खुजूर, रेश्मा हिडगू, विहान हिडगू व पाटीराम नरोटे हे छत्तीसगड राज्यातील पाखांदूर येथे उपचार घेत आहेत. साहिल सन्नू पदा या पाच वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे