गडचिरोली: 19 जुन पासुन पोलीस शिपाई चालक तर 21 जुन पासुन पोलीस शिपाई पदभरतीस प्रारंभ करण्यात आला. पोलीस शिपाई चालक पदाकरीता दरदिवशी सरासरी 1000 उमेदवारांची व पोलीस शिपाई पदाकरीता दरदिवशी सरासरी 1300 उमेदवारांची शारिरिक (मैदानी) चाचणी घेण्यात येणार आहे. दोन्ही भरती करिता मैदानी (शारिरीक) चाचणी 19 जून ते 12 जुलै 2024 या कालावधीत गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पटांगणावर आयोजित करण्यात आलेली आहे. मात्र गडचिरोलीमध्ये 21 जून रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शनिवार 22 जून रोजी मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्याने 22 जून रोजी होणारी मैदानी चाचणी रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे. सदरची रद्द झालेली मैदान चाचणी 13 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहे. याबाबत उमेदवारांना कळवण्यात येणार आहे तसेच 24 जून रोजी होणारी मैदान चाचणी व त्यापुढील मैदानी चाचणीमध्ये सद्यस्थितीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी असेही पोलीस दलामार्फत कळविण्यात आले आहे.




