महाबळेश्वर (सातारा) पुणे येथे झालेल्या पोर्शे कार अपघात नंतर या अपघातातील प्रमुख आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथील हॉटेल एमपीजी क्लबमधील अनाधिकृत बांधकामावर तोडण्याची कारवाई करण्यात आली. हि मिळकत शासकीय भाडेपट्टा मिळकत असल्याने हि मिळकतीत रहिवासाठी दिलेली होती. या मिळकतीमध्ये विनापरवाना आलिशान हॉटेल सुरू केले. या मिळकतीमध्ये अनाधिकृत आठ कॉटेज बांधले होते. याबाबत जिल्हाधिकारी व नगरपालिकडे अनेक तक्रारी आल्या होत्या.
पुणे येथील पोर्शे कार अपघातानंतर विशाल अग्रवाल यांचे वादग्रस्त हॉटेल हे चर्चेत आले होते. जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी हॉटेलवर कारवाई सुरू केली. या हॉटेलमधील विनापरवाना बारला सील ठोकले. यानंतर संपूर्ण हॉटेलला सील ठोकून हॉटेल बंद केले. हॉटेल व्यवस्थापनाला वेळोवेळी नोटिसा दिल्या होत्या. प्रशासनाने दिलेल्या नोटिसाप्रमाणे हॉटेलमधील कॉटेजचे बांधकाम न काढून टाकल्याने प्रशासनाने या हॉटेलमधील अनाधिकृत काॅटेजचे बांधकाम शनिवारी सकाळी पाडण्यात आले. यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील महाबळेश्वर नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील, वाईचे पो. नी जितेंद्र शहाणे, पो.नी रौफ इनामदार यांच्यासह पालिका विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.




