निवडणुकीचा पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
गडचिरोली: काल रात्रोच्या सुमारास नक्षली व पोलिस चकमक उडाली. या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव बघता नक्षली घटनस्थळावरून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी झडती घेतली असता नक्षल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र कॅडर भुमकन गावाजवळ महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर कसनसूरच्या 15 किमी उत्तर पूर्वेस, जारवंडी पो.स्टे च्या 12 किमी दक्षिण पूर्वेस तळ ठोकून आहेत अशी गुप्त माहिती काल दुपारी मिळाली असता अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली ताबडतोब नक्षलविरोधी ऑपरेशन सुरु करण्यात आले. आठ सी-60, 1 क्यूएटी आणि सीआरपीएफ पथक परिसरात शोध घेत असतांना नक्षल्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनीही प्रत्युत्तर देत गोळीबार केला. हि चकमक रात्रभर सुरुच होती होती. दरम्यान नक्षल्यांनी BGL ने गोळीबार केला त्याला जवानांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलिसांचा वाढता दबाव बघता अंधाराचा फायदा घेत नक्षली पळून गेले. सकाळी घटनास्थळी झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात नक्षल्यांचे सामान, साहित्य, वायर्स, जिलेटिनच्या काठ्या, बॅटऱ्या, सोलर पॅनल इत्यादी जप्त करण्यात आले. परिसरात अद्यापही नक्षलविरोधी अभियान सुरुच आहे




