नागपूर : पाच नद्यांचं विहंगम संगम, दाट वनराई आणि टेकडीवर असलेलं महादेवांचं मंदिर चित्रवत भासावं असा निसर्ग आपल्याला भेटतो ते नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आंभोरा इथं. विदर्भातील एक महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून आंभोर्याचा लौकिक आहे. ब्रम्हगिरी पर्वतरांगांच्या मधोमध वाहणाऱ्या वैनगंगा, कन्हान, आंब, मुरजा आणि कोल्हारी या पाच नद्यांचा संगम आहे. याच नदीच्या विस्तीर्ण पात्रावर अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथील गोल्डन गेट च्या ब्रिजची प्रतिकृती उभारली गेली आहे.
जर्मन टेक्नॉलॉजीनं हा केबल स्टेड ब्रीज तयार केला आहे. या ब्रीजचं आज (13 जानेवारी 2024) लोकार्पण होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंभोरा ब्रीजच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रामुख्यानं उपस्थित राहणार आहे. या पुलावर स्काय गॅलरी तयार करण्यात आली आहे. तसेच, यावर चढण्यासाठी 40 फूट उंचीची लिफ्टही लावण्यात आली आहे. गॅलरीवर उभं राहून नदी पात्र आणि परिसराचं विहंगम दृश्य पाहाता येणार आहे. हा पूल सुरू होत असल्यानं नागपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील सुमारे 25 गावातील नागरिकांना भंडारा जिल्ह्याशी थेट संपर्क करणं शक्य होणार आहे. किंबहुना या भागातील शेतकरी असो किंवा नागरिक यांना भंडारा येथील मार्केटचा आता थेट लाभ घेता येणार आहे. या सोबतच शिक्षण, आरोग्यासंदर्भातील सोयीसुविधांसाठीही हा पूल सोयीचा ठरणार आहे. या पुलामुळं त्यांचं सुमारे 70 ते 80 किलोमीटरचं अंतर कमी होईल आणि वेळेचीही बचत होणार आहे.




