चंद्रपुर मूल : तालुका कृषी अधिकाऱ्याने कार्यालयातीलच महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची तक्रार जिल्हा महिला तक्रार निवारण समितीकडे झाली होती. मात्र तीन महिन्यानंतरही चौकशी अहवाल तयार न झाल्याने – समितीची कार्यशैली संशयाच्या भोवऱ्यात असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पीडित कर्मचारी महिलेने तक्रारीत केला आहे.
मूल तालुका कृषी अधिकारी प्रशांत गोविंदा कासराळे यांनी २४ मार्च २०२४ रोजी रंगपंचमीच्या दिवशी शासकीय सुटी असताना कार्यालयात बोलावून विनयभंग केल्याची तक्रार कर्मचारी महिलाने २९ मार्च २०२४ रोजी जिल्हा महिला तक्रार निवारण समितीकडे केली होती. तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करणे गरजेचे होते. मात्र जिल्हा महिला तक्रार निवारण समितीकडून संबंधित चौकशी अहवालास विलंब केला जात आहे, आरोप तक्रारकर्ती पीडित महिला कर्मचाऱ्याने केला आहे
… मग समिती काय कामाची?
महिलांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटनांना रोखणे आणि त्यांचे निराकरण करणे आणि अशा छळाशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी यंत्रणा प्रदान करणे यासाठी शासनाकडून तालुका व जिल्हास्तरावर महिला तक्रार निवारण समितीचे गठण करण्यात येते. मात्र समितीकडून महिलांब होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळत नसेल तर महिलांच्या सुरक्षेसाठी असलेली समिती काय कामाची, असा सवाल तक्रारकर्ती महिला कर्मचाऱ्याने उपस्थित केला आहे.
९ एप्रिलला कर्मचारी महिलेची तक्रार प्राप्त झाली. तक्रारीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात मूल तालुका कृषी कार्यालयात भेट देऊन तक्रारकर्ती महिलेसह कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांचे बयाण घेण्यात आले. सुनावणी घेऊन लवकरच वरिष्ठांकडे चौकशी अहवाल सादर करण्यात येईल.
–मेघा ताटीकोंडावार, अध्यक्ष जिल्हा महिला तक्रार निवारण समिती, चंद्रपूर




