राज्यात सध्या ऊन, पाऊस आणि उकाडा अशी परिस्थिती दिसून येत आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला.
आज सोलापूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला. तर नांदेड, धाराशिव, लातूर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.उद्या म्हणजेच रविवारी विदर्भातील यवतमाळ आणि अमरावती उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात तसेच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. यासोबतच खानदेशसह नाशिक, पुणे, सातारा आणि सांगली भागातही पावसाचा अंदाज देण्यात आला. सोमवारी हवामान विभागाने विदर्भातील वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीचा ऑरेंज अलर्ट दिला. तसेच विदर्भातील इतर जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने रविवार ते मंगळवार चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज दिला. तर विदर्भातील इतर जिल्हे, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
पाऊस नेमका कुठे पडणार ? राज्यातील काही भागात गारपीटीचाही इशारा




