विभागीय चौकशीही होणार : गडचिरोली एसपींचे चंद्रपूर सीईओंना पत्र
चंद्रपूर प्रतिनिधी : राज्याच्या गृह विभागाच्या सहसचिवांच्या नावे पोलिस अधीक्षकांना ई-मेलद्वारे पोलिस पत्नीच्या बदलीचे बनावट आदेश पाठवल्याप्रकरणी अटक झालेल्या शिक्षक पतीवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असून त्यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे. यासंदर्भात गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सीईओंना गुरुवारी पत्र पाठवले आहे. संदीप वद्देलवार असे त्या बनावट बदली आदेश पाठविणाऱ्या शिक्षक पतीचे नाव आहे.
सावली पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या मंगरमेंढा जि. प. शाळेत संदीप वद्देलवार हे शिक्षक आहेत, तर त्यांची पत्नी मीनाक्षी पोरेड्डीवार या गडचिरोली जिल्ह्यात पोलिस अंमलदार आहेत. वद्देलवार यांनी आपली पत्नी मीनाक्षी यांची बदली झाल्याचा बनावट आदेश गडचिरोली पोलिस अधीक्षकांना ई- मेलद्वारे पाठविला होता. चौकशीदरम्यान बोगस आदेश असल्याचे समोर आल्यामुळे संदीप वड्डेलवार याला अटक करण्यात आली होती. यासंदर्भात गडचिरोली पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी चंद्रपूरचे सीईओ यांना पात्र पाठवले त्याअनुषंगाने या शिक्षकावर निलंबनाची कारवाई व विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.
🔸काय होते प्रकरण ?
गडचिरोली पोलिस अधीक्षकांना ९ मे २०२३ रोजी गृह विभागाच्या कार्यालयाचा पत्ता असलेला ई- मेल प्राप्त झाला होता. यात पोलिस मदत केंद्र गट्टाजभिया येथील अंमलदार मीनाक्षी पोरेड्डीवार व अन्य एका अंमलदाराची पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे तात्पुरती बदली केल्याचा उल्लेख होता. त्याखाली सहसचिव म्हणून व्यंकटेश भट यांचे नाव व स्वाक्षरी होती. विशेष म्हणजे गृह विभागाच्या नियमित ई- मेलवरून हा मेल आला नव्हता. शिवाय अंमलदारांच्या बदल्याचे
आदेश गृह विभागातून निघत नसल्याने पोलिस अधीक्षक
नीलोत्पल यांनी सायबर विभागाकडे चौकशी करण्यास सांगितले. यावेळी तो मेल गृह विभागातून आला नसल्याचे समोर आले. तपासाअंती ब्रह्मपुरी येथील एका नेटकॅफेवरून पोलिस अंमलदार मीनाक्षी पोरेड्डीवार यांचा शिक्षक पती संदीप वद्देलवार याने पाठवल्याचे समोर येताच पोलिसांनी त्याला अटक केली होती.
गुरुवारी गडचिरोली पोलिस अधीक्षकांचे पत्र प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने त्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असून त्यांची विभागीय चौकशीही होणार आहे.
–विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर




